कल्याण दि. 22 जून :
बदलापूरपर्यंत मंजूर केलेल्या मेट्रोचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करावा, भिवंडी-कल्याण मेट्रोच्या निविदा काढाव्यात आणि भिवंडी तालुक्यातील ६० गावांना जोडणारा रिंगरोड तयार करून सुविधा द्याव्यात अशा विविध मागण्या खासदार कपिल पाटील यांनी केल्या आहेत. खासदार कपिल पाटील यांनी नुकतीच एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवासन यांची भेट घेतली. त्यावेळी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील एमएमआरडीच्या क्षेत्रातील प्रश्नांकडे खासदार पाटील यांनी लक्ष वेधले.
बदलापूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. या शहरासाठी मेट्रो मंजूर करण्यात आली आहे. मात्र, त्याचा अद्याप सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार केलेला नाही. बदलापूरहून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या नागरीकांना रस्ते मार्गाने वाहतूककोंडी आणि लोकलने गर्दीचा सामना करावा लागत आहे. या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी लवकरात लवकर मेट्रो सुरू करण्याची गरज असून त्याचा डीपीआर तयार करण्याचे आदेश देण्याची मागणी खासदार कपिल पाटील यांनी केली.
तर कल्याण-भिवंडी-ठाणे मेट्रो मार्ग मंजूर करण्यात येऊनही अद्याप कल्याण ते भिवंडी मार्गाच्या निविदा काढण्यात आलेल्या नाहीत. या मार्गाचे काम वेगाने झाल्यास लोकलसेवेवरील ताण कमी होण्याबरोबरच प्रवाशांची सुविधा होईल, याकडेही खासदार कपिल पाटील यांनी लक्ष वेधून कामाच्या निविदा काढण्याची मागणी केली.
तसेच एमएमआरडीएअंतर्गत येणाऱ्या ६० गावांतील कामांचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करावा. तसेच या गावांना जोडणारा रिंग रोड तयार करून पिण्याचे पाणी, पथदिवे, रस्ते कॉंक्रीटीकरण आदी मुलभूत नागरी सुविधा पुरवाव्यात आदी मागण्या खासदार कपिल पाटील यांनी केल्या आहेत.