कल्याण – डोंबिवली दि. 4 जून :
मुंबईच्या धर्तीवर आता कल्याण डोंबिवलीतही थेट सोसायटी स्तरावर लसीकरण मोहीम राबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी खासगी रुग्णालयांमार्फत सोसायटीमध्ये लसीकरण राबवण्याचे धोरण (नियमावली) आज जाहीर केले. त्यामुळे शासकीय पातळीवर लस तुटवड्यामूळे काहीशी मंदावलेल्या लसीकरण मोहिमेला खासगी रुग्णालयांमुळे गती मिळण्याची शक्यता आहे. (Vaccination in the society will also be possible in Kalyan Dombivali; Policy announced by KDMC)
संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासह कोरोना प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण वेगाने करणे आवश्यक आहे. त्यामूळे शासनाच्या धोरणानूसार आता खासगी रुग्णालयांनाही कोविड लसीकरणासंबंधी मान्यता देण्याबाबतचे धोरण महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जाहीर केले. त्यानुसार संबंधित खासगी रुग्णालयांनी स्वखर्चाने वितरकाकडून लस खरेदी करुन योग्य ते शुल्क आकारुन लसीकरण करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 33 खासगी रूग्णालयांना खासगी लसीकरण केंद्र म्हणून मान्यता दिल्याचे केडीएमसीतर्फे सांगण्यात आले.
ज्या आस्थापना (ऑफिसेस) गृहसंकुले (हौसिंग सोसायटी) 18 वर्षे आणि त्यापुढील नागरिकांचे सशुल्क लसीकरण करण्यास इच्छुक असतील त्यांनी या रूग्णालयांशी संपर्क साधून लसीकरण करून घेण्याचे महापालिका आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर मान्यताप्राप्त खासगी रूग्णालयांनी वितरकांकडून लस खरेदी करून, लस उपलब्ध असल्याची माहिती प्रसिद्ध करावी. या खासगी रुग्णालयांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ, अनुषंगिक वैद्यकीय सामग्री उपलब्ध करून शासनाच्या कोविन पोर्टलमध्ये लाभार्थ्यांची आवश्यक माहिती भरून लसीकरण करण्याच्या सूचना केडीएमसीने दिल्या आहेत.
तर लसीकरणासाठी परवानगी दिलेल्या खासगी लसीकरण केंद्रांच्या माहितीबरोबरच हे धोरण हे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.