
कल्याण दि.12 मे :
सध्या सुरू असणाऱ्या लसीकरण मोहीमेसाठी ऑनलाईन पूर्वनोंदणीची अट असून स्मार्टफोन नसणाऱ्या समाजातील वंचित लोकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते अजय सावंत यांनी केली आहे. यासंदर्भात सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत यासह विविध मागण्या केल्या आहेत.
वंचित घटकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यासह कल्याण डोंबिवलीतील खासगी रुग्णवाहिका राज्य सरकारने आपल्या ताब्यात घेऊन त्या मोफत उपलब्ध करून देण्याची मागणीही अजय सावंत यांनी केली आहे. कल्याण डोंबिवलीत असणाऱ्या खासगी रुग्णवाहिका चालक सर्वसामान्यांना अव्वाच्या सव्वा दराने भाडे आकारात अक्षरशः लुबाडणूक करत असल्याचे सावंत यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व रुग्णवाहिका आपल्या ताब्यात घेऊन सामान्य नागरिकांना त्या मोफत उपलब्ध करून द्याव्यात असे सावंत यांनी सांगितले.
त्याचबरोबर केडीएमसीच्या आर्ट गॅलरी कोवीड सेंटरमध्ये कोवीडचा कमी प्रमाणात संसर्ग झाला असतानाही रुग्णांचा मृत्यू होत असल्याबाबत सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात प्रश्न उपस्थित केले आहेत. इथल्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे इतर रुग्णांच्या नातेवाईकांनाही कोरोना लागण झाल्याचे सांगत डॉ. अमित गर्ग आणि डॉ. आलम यांच्या मनमानीमूळे हे कोवीड रुग्णालय मृत्यूचे केंद्र बनल्याचा धक्कादायक आरोपही सावंत यांनी आपल्या पत्रात केला आहे. राज्य शासनाने या सर्व प्रश्नांवर तातडीने उपाय योजना करावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.