डोंबिवली दि.8 मे :
सध्या ऑक्सिजनची भासणारी कमतरता पाहता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पुढाकाराने ऑक्सिजन बँक ही संकल्पना राबवण्यात येत आहे. या अंतर्गत 120 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या असून डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेमध्ये या संकल्पनेला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.
रुग्णालयात दाखल होईपर्यंत कोवीड रुग्णाची ऑक्सिजनची पातळी योग्य प्रमाणात राहण्याच्या दृष्टीकोनातून डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या संयुक्त विद्यमाने ही मोफत ऑक्सिजन बँक योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ कल्याण लोकसभा मतदार संघातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या शहरांतील कोरोना बाधित रुग्णांना घेता येणार आहे. या योजनेद्वारे कोरोनामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेल्या रुग्णांना घरच्या घरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
यावेळी शहरप्रमुख राजेश मोरे, राजेश कदम, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख मंगेश चिवटे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, तात्या माने, विधानसभा संघटक सदानंद थरवळ, विनिता राणे, विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
लोकांमध्ये गेल्यावरच ऊर्जा मिळते – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
दरम्यान दुसऱ्यांदा कोवीडला मात देऊन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आजपासून पुन्हा एकदा आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. दुसऱ्यांदा झालेल्या कोरोनामुळे आपण शारीरिकरित्या काहीसे थकलो होतो. मात्र लोकांमध्ये गेल्यावर आणि लोकांसाठी काम केल्यावर आपल्याला नविन ऊर्जा मिळते अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी दिली.
ऑक्सिजन कॉन्सट्रेटरसाठी संपर्क :- 8907776001