कल्याण दि.1 मे :
कल्याण रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या रेल्वे यार्डातील गोदामात असणाऱ्या वायर आणि इतर साहित्याला आज दुपारी मोठी आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात ही आग नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. (A huge fire broke out in a godown in the yard near Kalyan railway station)
कल्याण रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या वरिष्ठ मंडळ विद्युत अभियंता कार्यलयानजीक रेल्वेच्या ‘सिग्नल अँड टेलीकम्युनिकेशन’ विभागाच्या साहित्याचे गोडावून आहे. या गोडावूनमध्ये केबल वायर्ससह पाईप असे साहित्य साठवून ठेवण्यात आले आहे. आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास या ठिकाणाहून अचानक मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. हा धूर इतका प्रचंड होता की रामबागसारख्या लांबच्या परिसरातूनही धुराचे लोट दिसत होते.
सुरुवातीला रेल्वे पोलिसांसह स्थानिक कर्मचाऱ्यांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने हे प्रयत्न तोकडे ठरले. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांना अखेर या आगीची माहिती देण्यात आली. केडीएमसीच्या कल्याण पश्चिम, पूर्व, एमआयडीसी अग्निशमन केंद्रातील जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. सुदैवाने अवघ्या तासाभरातच अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याचे दिसून आले. दरम्यान या आगीमध्ये गोदामातील केबल वायर मोठ्या प्रमाणात जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तर या आगीचे नेमके कारण काही समजू शकले नाही.