कल्याण-डोंबिवली दि.5 एप्रिल :
वाढत्या कोवीड संख्येच्या पार्श्वभूमीवर रविवारी शासनाने नविन निर्बंध लागू केले आहेत. या सर्व निर्णयांची कल्याण डोंबिवलीमध्ये अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती महापालिका आणि पोलीस प्रशासनातर्फे ‘एलएनएन’ला देण्यात आली आहे. शासनाच्या नविन निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, कल्याण एसीपी अनिल पोवार, डोंबिवली एसीपी मोरे यांच्यासह केडीएमसी आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तर मॅरेज हॉल होणार सील – डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त
कोवीडबाबत शासनाच्या आलेल्या निर्बंधांची आज रात्री 8 वाजल्यापासून काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. विशेषतः मॅरेज हॉल आणि मार्केट परिसरावर आमचे बारीक लक्ष असणार असणार आहे. या निर्बंधांचे उल्लंघन करणारे मॅरेज हॉल 30 एप्रिलपर्यंत सील करण्याची कारवाई केली जाणार आहे. तर नियमांचे उल्लंघन करून सोहळे आयोजित करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांवरही कारवाई केली जाणार असल्याचे केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एलएनएनशी बोलताना सांगितले. त्यामूळे दुकानदार आणि नागरिकांनी या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
विनामास्क आढळणाऱ्या व्यक्तीची रवानगी थेट कॉरंटाईन सेंटरमध्ये- एसीपी अनिल पोवार
शासनाच्या निर्णयानुसार आज रात्रीपासून विविध नियमांची कल्याण डोंबिवलीत अंमलबजावणी केली जाणार आहे. सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत शहरांत जमावबंदी लागू असणार आहे. तर रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. त्याशिवाय विनामास्क फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवरील कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असून अशा लोकांची रवानगी थेट कॉरंटाईन सेंटरमध्ये केली जाणार असल्याचे एसीपी अनिल पोवार यांनी एलएनएनशी बोलताना सांगितले. विनामास्क फिरणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन 500 रुपये दंड आकारला जाईल. त्यानंतर कल्याणात जुने महात्मा फुले पोलीस ठाणे आणि डोंबिवलीत रामनगर पोलीस ठाण्यात त्यांना नेण्यात येईल. या दोन्ही ठिकाणी उपस्थित डॉक्टरांकडून त्यांची कोवीड चाचणी केली जाणार असून त्यात पॉझिटिव्ह आढळणाऱ्या व्यक्तींना थेट आयसोलेशन सेंटरला पाठवण्यात येणार असल्याचेही एसीपी पोवार यांनी एलएनएनला सांगितले.
शासनाच्या वतीने लागू केलेल्या निर्णयावर अंमलबजावणीसाठी केडीएमसी आणि पोलीस प्रशासन वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती केली जाणार आहे.