कल्याण/ डोंबिवली दि.17 मार्च :
एकीकडे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडलेल्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच कल्याण डोंबिवली पुन्हा एकदा कोरोना उद्रेकाच्या उंबरठ्यावर आहे की काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज दिवसभरात कल्याण डोंबिवलीमध्ये तब्बल 593 रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Kalyan Dombivli on the verge of Corona eruption? Today found 593 patients throughout the day)
गेल्या महिन्यात फेब्रुवारीपासून कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांनी पुन्हा एकदा 100 चा आकडा ओलांडला. मग 100 चे दिडशे आणि दिडशेचे मग गेल्या आठवड्यापर्यंत अडीचशे- तीनशेपर्यंत रुग्णसंख्या होती. तर 10 मार्चला 392 चा आकडा आला आणि केडीएमसी प्रशासन हादरून गेलं. एवढ्या मोठ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तातडीने सर्वांची बैठक घेत कल्याण डोंबिवलीमध्ये निर्बंध लागू केले. मात्र त्याला एक आठवडाही उलटत नाही तोच आज पुनः एकदा एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून आल्याने कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाची झोप उडाली आहे.
त्यातही एकट्या डोंबिवली पूर्वेत तब्बल 206 आणि कल्याण पश्चिमेच्या 157 मिळून साडेतीनशेपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्याखालोखाल डोंबिवली पश्चिम 88, कल्याण पूर्व 84, मांडा टिटवाळा 45 आणि मोहन्यात 13 रुग्ण आज आढळून आले आहेत.
एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या कल्याण डोंबिवली शहरांमध्ये केडीएमसी प्रशासनाने अथक मेहनत घेत राबवलेल्या उपाय योजनांमुळे कोरोना रुग्णसंख्येचा आलेख 41 पर्यंत खाली आला होता. मात्र कोरोनाच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कोरोनाने कल्याण डोंबिवलीमध्ये आपले हातपाय पसरवल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. जी आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत चिंतेची बाब आहे. त्यामूळे केडीएमसी प्रशासनाकडून यावर आता कोणते आणि काय निर्णय घेतले जातात हे लवकरच स्पष्ट होईल.
Kalyan dombivli corona hotspot, kdmc, covid 19,