डोंबिवली दि.24 फेब्रुवारी:
कुत्रा चावला म्हणून संतापलेल्या तरुणाने कुत्र्याचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत घडला आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.
डोंबिवली पश्चिमेच्या कोपर रोडवर असणाऱ्या उद्यानामध्ये अजय नायडू हे देखभालीचे काम करतात. या उद्यानाच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी याठिकाणी शेरु नावाचा कुत्राही पाळला होता. उद्यान बंद केल्यानंतर नायडू हे शेरुला या उद्यानात मोकळे सोडत. गेल्या शुक्रवारी 19 फेब्रुवारीला दुपारी 2.30 च्या सुमारास अजय मगरे हा दारु पिऊन गार्डन जवळ आला असता नायडू यांनी त्याला उद्यान बंद झाल्याचे सांगितले. परंतू अजयने ते न ऐकता भिंतीवरुन उडी मारुन उद्यानाच्या आत गेला. त्याचवेळी शेरूने अजयच्या अंगावर धावून जात त्याच्या हाताचा चावा घेतला. त्यावेळी नायडू यांनी त्वरित शेरूला बाजूला करत अजयला उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात नेले. तेथे उपचार सुरू असतानाच अजयने कुत्र्याला मारुन टाकण्याची धमकी दिली होती. परंतू अजय दारुच्या नशेत असल्याने असे बोलला असे वाटल्याने नायडू यांनी त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही.
मात्र सोमवारी रात्री नायडू हे उद्यान बंद करण्यासाठी गेले असता त्यांनी शेरुला आवाज दिला. परंतू त्यावर कोणताच प्रतिसाद आला नाही. त्याचवेळी अजयने शेरुला मारुन गोणीत भरुन कचराकुंडीत टाकल्याची माहिती नायडू यांच्या परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने दिली. जवळील कचराकुंडीतील गोणीत पाहिले असता शेरु मृतावस्थेत आढळून आल्याचे नायडू यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.