मुंबई दि.24 फेब्रुवारी :
कोरोनाकाळातील कोवीड योद्ध्यांच्या कार्याला कल्याणच्या श्रावणी जाधवने अनोखी मानवंदना दिली आहे.
एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे १४ कि.मी.चे सागरी अंतर पार करून कोरोनायोद्धा यांना मानवंदना दिली. श्रावणीने एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडियापर्यंतचे अंतर पोहून पार करत या कोवीड योद्ध्यांना ही मानवंदना दिली. हे 14 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी श्रावणीला तब्बल 3 तास 43 मिनिटे लागली.
श्रावणी जाधव ही ठाणे जिल्हा जलतरण संघटनेची जलतरणपटू असून तिच्या या उपक्रमास स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच मुंबईच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह स्थायी समिती सदस्य सुजाता सानप आणि स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे किशोर शेट्टी आणि संतोष पाटील यांनीदेखील तिला शुभेच्छा देऊन तिच्या या कामगिरीचे कौतुक केले.
कोरोनाकाळात डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, स्मशानभूमीतील कर्मचारी, साफसफाई कर्मचारी, शासकीय सेवेतील सर्वच कर्मचारी आणि अधिकारी यांनी उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून त्याला मानवंदना देण्यासाठीच श्रावणीने एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे १४ कि.मी.चे सागरी अंतर पोहून पार केले. या यशाबद्दल कल्याणात विविध मान्यवरांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.