Home Uncategorised उल्हास नदी प्रदूषणाची समस्या न सुटल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरणार – जगन्नाथ शिंदे...

उल्हास नदी प्रदूषणाची समस्या न सुटल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरणार – जगन्नाथ शिंदे यांचा इशारा

 

कल्याण दि.13 फेब्रुवारी :
उल्हास नदीतील प्रदूषणाविरोधात नदीपात्रात आंदोलन सुरू असून अद्यापही प्रशासनाकडून कोणतीच हालचाल होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन तातडीने हा प्रदूषणाचा प्रश्न न सोडवल्यास रस्त्यावरून उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिला आहे. नदीपात्रात उपोषणाला बसलेल्या ‘मी कल्याणकर’ संस्थेच्या नितीन निकम यांची जगन्नाथ शिंदे यांनी भेट घेत आपला पाठिंबा जाहीर केला.

उल्हास नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी गेल्या 3 दिवसांपासून मी कल्याणकर सामाजिक संस्थेतर्फे हे आंदोलन सुरू आहे. मात्र अद्याप प्रशासनाने या प्रश्नी कोणतीही दखल घेतलेली नाही की हालचाल सुरू केलेली नाहीये. प्रशासनाच्या या बेजबाबदार वर्तवणुकीचा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी कडक शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. तसेच लवकरात लवकर हा प्रश्न न सुटल्यास राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

तर येत्या आठवड्यात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचीही याबाबत भेट घेणार असल्याचे जगन्नाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान उल्हास नदीतील प्रदूषणाविरोधात आंदोलनाला बसलेल्या ‘मी कल्याणकर’ संस्थेच्या प्रतिनिधींना राजकीय पक्ष तसेच सामाजिक संस्थांचा पाठींबा वाढताना दिसत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा