डोंबिवली दि.8 फेब्रुवारी :
डोंबिवलीजवळील खोणी गावातील “लेक शोर” काॅम्प्लेक्समध्ये गेल्या काही आठवड्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या 2 पैकी एका माकडाला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. तर दुसऱ्या माकडलाही लवकरच जेरबंद करण्याचा विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे.
गेल्या 2 महिन्यांपासून या कॉम्प्लेक्समध्ये या दोघा मर्कट महाशयांनी उच्छाद घातला होता. सुरवातीला स्थानिकांनी मुलांच्या हौसेखातर केळी आणि इतर फळे त्यांना देण्यास सुरुवात केली. आणि या मर्कट महाशयांना याठिकाणी थांबण्याची ही नामी संधी मिळाली. मात्र कोरोना काळात खायला न मिळाल्याने या माकडांनी थेट इथल्या लोकांच्या थेट घरात जाऊन अन्न, फळे आणि इतर खाण्याच्या वस्तू घेण्यास सुरुवात केली. त्यामूळे घाबरलेल्या नागरिकांनी अखेर वनविभागाच्या हॅलो फॉरेस्ट 1926 या ट्रोल फी नंबरवर संपर्क साधून ही तक्रार दिली. या तक्रारींची दखल घेत कल्याण वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कल्पना वाघेरे यांनी वनपाल मच्छिद्र जाधव आणि वनरक्षक रोहित भोई यांना घटनास्थळी पाठवले. तसेच वाॅर रेस्क्यू फाॅऊडेशनच्या डोंबिवली टिमचे स्वयंसेवक विशाल कंथारिया यांच्याशीही संपर्क साधला.
कल्याण वनविभाग आणि विशाल कंथारिया यांनी आधी माकडांना कोणत्याही प्रकारचे खाणे न देण्याचे तसेच खिडक्या आणि बाल्कनी बंद ठेवण्याचे आवाहन केले. तसेच कल्याण वनविभागाकडून या परिसरात ट्रॅपही लावण्यात आला. अखेर अनेक अथक प्रयत्नांनंतर आज सकाळी दोनपैकी 1 माकड त्या पिंजऱ्यात अडकल्याने स्थानिकांनी काहीसा सुटकेचा निःश्वास सोडला. तर दुसऱ्या माकडलाही लवकरच पकडून वनविभागाच्या आदेशान्वये निर्सगमुक्त करणार असल्याचे वाॅर संस्थेचे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी सांगीतले.
ही मोहीम यशस्वी होण्यासाठी वाॅर रेस्क्यू फाॅऊडेशनचे जेष्ठ वन्यजीव रक्षक विशाल कंथारिया, महेश मोरे, प्रेम आहेर, स्वप्निल कांबळे, विशाल सोनावणे, पार्थ पाठारे, रेहान मोतिवाला, फाल्गुनी दलाल आणि सुहास पवार तसेच डिलाॅ संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र पाटील, तेजस मोरे, पंकज वर्मा, तेजस कवठे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.