कल्याण दि.2 फेब्रुवारी :
ऐन निवडणुकीच्या तोंडावर कल्याण डोंबिवलीत कालपासून राजकीय रंगांची उधळण होत असतानाच आपल्या रंग बदलण्यात अत्यंत माहीर समजला जाणारा दुर्मिळ असा ‘शॅमेलीऑन’ सरडा कल्याणात आढळून आला आहे. कल्याण पश्चिमेच्या गांधारी परिसरातील एका घरात हे रंगबदलू बहाद्दूर आढळून आले.
याबाबत वॉर रेस्क्यू फाऊंडेशनला संबंधित व्यक्तीने माहिती दिल्यानंतर या संस्थेच्या प्रतिनिधी फाल्गुनी दयाल यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या ‘शॅमेलीऑन’ला पकडले आणि नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. ‘शॅमेलीऑन’ ही दुर्मिळ प्रजाती असून शहरीकरण झालेल्या कल्याणसारख्या ठिकाणी तो आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आपल्या रंग बदलण्याच्या कौशल्याबरोबरच लांब जिभेसाठीही हा सरडा ओळखला जातो. आपल्या शरिराच्या तिप्पट आकाराच्या जिभेने ‘शॅमेलीऑन’कडून कीटकांची शिकार केली जाते. मात्र जगभरात ‘शॅमेलीऑन’ प्रजातीची रंग बदलण्याचे वकूब हीच खरी ओळख समजली जाते.