Home ठळक बातम्या अडथळ्यांची शर्यत करायची आणि गतीही मोजायची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा

अडथळ्यांची शर्यत करायची आणि गतीही मोजायची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा नविन पत्रीपुलाचे लोकार्पण

कल्याण / डोंबिवली दि.25 जानेवारी :
केंद्राच्या अनेक संस्थांकडे राज्याची कामे अडकून आहेत. एकीकडे अडथळ्यांची शर्यत करायची आणि मग आपली गती मोजायची अशा शेलक्या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. कल्याणातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा नविन पत्रीपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ऑनलाईनद्वारे करण्यात आले. त्यावेळी कल्याण डोंबिवलीतील विकासकामांवर भाष्य करतानाच त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार कपिल पाटील, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार गणपत गायकवाड, आमदार राजू पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नविन आई तिसाईदेवी उड्डाणपूल अर्थातच नविन पत्रीपूलाचे धुमधडाक्यात लोकार्पण करण्यात आले.

https://youtu.be/HxUOyuxKnGQ

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की काम करताना एखाद्याच्या तंगड्यात तंगडं घालून पुढे जाऊ द्यायचे नाही आणि दुसरीकडे नावेही ठेवायची. नावं ठेवणं ही सोपी गोष्ट असून अशा व्यक्तींनी आपले नाव कशाला दिले जाईल का? आपले पुढे काय होणार याचाही विचार केला पाहीजे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचे कान उपटले. विकासकामे मग ती केंद्राची असो की राज्य सरकारची. त्यातील अडथळे दूर होणे महत्त्वाचे असून कोणत्याही पातळीवर आपल्याला तू तू मे मे होता कामा नये अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

तर नविन पत्रीपुलाच्या कामाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, एमएसआरडीसी अधिकारी राधेश्याम मोपलवार आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे कौतुक करत अत्यंत उपयोगी काम विक्रमी वेळेमध्ये पूर्ण केल्याबद्दल शाबासकीची थाप दिली. तर या कामाप्रमाणे शिळफाटा रस्त्याचे कामही आपल्याला विक्रमी वेळेमध्ये पूर्ण करून दाखवा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी एमएसआरडीसी अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान कल्याणसह डोंबिवलीकरांसाठी पत्रीपुल हा अत्यंत महत्त्वाचा होता. त्याचे काम सुरू असल्याने गेल्या 2 वर्षांपासून नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. मात्र आता पत्रीपुलाचे लोकार्पण झाल्याने नागरिकांनी सुटकेचा विश्वास सोडत आनंद व्यक्त केला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा