राज्यात गेल्या ४० वर्षांपासून तीन आसनी रिक्षा हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रमुख घटक झाला आहे. राज्यातील शहरी, निमशहरी भागाबरोबरच सध्या ग्रामीण भागातही तीन चाकी रिक्षांच्या माध्यमातून २० लाख रिक्षाचालक व्यवसाय करीत आहेत. हातावर पोट असलेल्या या रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात राज्य सरकारच्या पातळीवर अनेक बैठका झाल्या. मात्र, त्याबाबत आजतागत ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, याकडे खासदार कपिल पाटील यांनी लक्ष वेधले. कोरोनाच्या आपत्तीत लाखो रिक्षाचालक-मालकांसह कुटुंबियांची फरफट झाली. या कुटुंबांना राज्य सरकारकडून कोणतेही साह्य मिळाले नाही. याउलट देशातील अन्य काही राज्यात रिक्षाचालकांसाठी पॅकेज दिले गेले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील रिक्षाचालकांना मदतीचा आधार देण्याची गरज आहे, असे खासदार कपिल पाटील यांनी सांगितले.
कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेनंतर रिक्षाचालकांना पेन्शन उपदान, भविष्यनिर्वाह निधी, वैद्यकीय मदत देता येऊ शकेल. या रिक्षाचालकांच्या माध्यमातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. तर केवळ विमा कंपन्यांकडे ७ हजार कोटी रुपये जमा केले जातात. त्यामुळे रिक्षाचालकांना मदत करण्याची गरज आहे. तरी रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ स्थापन झाल्यास रिक्षाचालकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविता येतील, असे खासदार कपिल पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. या संदर्भात योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे.
Home ठळक बातम्या रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे – खासदार कपिल पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी