कल्याण दि.6 ऑक्टोबर :
कर्नाटकमध्ये झालेल्या स्केटिंग स्पर्धेत कल्याणच्या 6 बालखेळाडूंनी अतिशय चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे 9 रेकॉर्ड प्रस्थापित केले. विशेष म्हणजे या 6 छोट्या खेळाडूंनी सलग (न थांबता) 81 तास स्केटिंग करत 10 हजार 750 लॅप्सचा नविन रेकोर्ड बनवला.
कर्नाटकमधील सुप्रसिद्ध शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब आणि रोट्रॅक्ट क्लबतर्फे ही 81 तासांची स्केटेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबच्या 200 मीटरच्या स्केटिंग ट्रॅकवर 27 ते 30 सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली. यापूर्वी रचला गेलेला 81 तासांत 10 हजार लॅप्सचा रेकॉर्ड मोडण्याचे प्रमूख आव्हान या स्पर्धेत होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक संघाकडून दोन टिम (एका टीममध्ये 3 खेळाडू) मिळून हा रेकॉर्ड मोडण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
ज्यामध्ये कल्याणच्या खेळाडूंनी इतर सर्व स्पर्धकांना मागे टाकत जुना रेकॉर्ड मोडीत तर काढलाच पण त्याचबरोबर 9 नविन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रेकोर्डही बनवले. कल्याणच्या पीएस स्केटिंग अकादमीच्या सुमीत कपूर (10वर्षे), आस्था नायकर (11 वर्षे), अद्वैत नायर (11वर्षे), हर्ष केवट (14 वर्षे), रचित मूळे (8वर्षे) आणि सर्वात लहान अशा अवघ्या 5 वर्षांच्या हरसिमरत कौर या 6 खेळाडूंनी ही चमकदार कामगिरी केल्याची माहिती कोच पवनकुमार ठाकूर यांनी एलएनएनला दिली. या सर्वांनी 27 सप्टेंबरला स्केटिंग करण्यास सुरुवात केली आणि 81 तासांत 10 हजार 750 लॅप्स पूर्ण करत नविन विक्रम प्रस्थापित केला.
त्याशिवाय एशिया बुक, इंडियन बुक, एशिया पॅसिफिक, बेस्ट इंडियन अहेड ऑफ बिलियन, इंडियन आचिव्हर्स बुक, एक्स्ट्रीम, चिल्ड्रन, नॅशनल आणि ग्लोबल असे 9 रेकॉर्डवरही आपली नावं कोरली. यानंतर आता हे खेळाडू जानेवारी महिन्यात होणाऱ्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न करणार असल्याचेही कोच ठाकूर यांनी सांगितले.
दरम्यान कल्याणच्या या 6 छोट्या खेळाडूंनी स्केटिंगसारख्या आंतराष्ट्रीय खेळामध्ये आपली चुणूक दाखवून देत ‘हम भी किसींसे कम नही’ असा संदेश देत कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.