कल्याण -डोंबिवली दि. 29 एप्रिल :
उद्धव ठाकरे सरकार सध्या भयंकर भयभीत झाले असून या सरकारमधील सहा बडे नेते 2 हजार कोटींच्या वसुलीप्रकरणी येत्या 4 महिन्यात सीबीआयच्या दारात उभे असतील असा खळबळजनक दावा भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कल्याणात केले आहे. कल्याण डोंबिवलीतील कोवीड परिस्थितीबाबत सोमय्या यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे सरकारवर टिका करताना त्यांनी हा दावा केला.
उद्धव ठाकरे सरकार अत्यंत भयभीत झाले असून त्यांच्या सरकारमधील 6 मंत्री सीबीआयच्या निमंत्रणाची वाट पाहत आहेत. त्यामुळे परमवीर सिंग, रश्मी शुक्ला, सचिन वाझे असे प्रकरणे काढून प्रेशर आणण्याचे पाप उद्धव ठाकरे सरकार करत असल्याची टिका सोमय्या यांनी यावेळी केली.
ऑक्सिजन आणि रेमडीसीवीरच्या तुटवड्याने कोवीड मृत्यू वाढले…
ऑक्सिजन पुरवठा आणि रेमडीसीवीरच्या अपुऱ्या पुरवठ्यामूळे महाराष्ट्रात कोवीड मृत्यूचे प्रमाण वाढल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी यावेळी केला. रुग्णालयांना 50 टक्के ऑक्सिजन आणि 25 टक्के रेमडीसीवीरचा पुरवठा होत असल्याने 12 एप्रिलनंतर कोवीड मृत्यू वाढल्याचे सोमय्या म्हणाले. तर याच कारणास्तव कल्याण डोंबिवलीमध्ये खासगी रुग्णालये 50 टक्केच रुग्ण घेत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
तर कोवीड लसींबाबत केंद्र सरकारने आयात करण्यास परवानगी दिली असून उद्धव ठाकरे सरकारने आता 1 मेपासून योग्यप्रकारे लसीकरण करून दाखवावे. लसींबाबत उठसुठ केंद्र सरकारवर आरोप करणाऱ्या राज्य सरकारमधील नेत्यांवर आता लसीकरणाची जबाबदारी आहे, ती त्यांनी योग्य तऱ्हेने पार पाडून दाखवण्याचे आव्हानही किरीट सोमय्या यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिले.
दरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याबरोबर कल्याण डोंबिवलीतील एकंदर कोवीड परिस्थिती, बेड, ऑक्सिजन, रेमडीसीविर आदींबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, भाजयुमोचे गौरव गुजर, रविंद्र चव्हाण आदी भाजप पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.