Home ठळक बातम्या ठाणे दिवा दरम्यानच्या 5व्या- 6व्या मार्गिकेचे काम पूर्ण ; लोकल प्रवास होणार...

ठाणे दिवा दरम्यानच्या 5व्या- 6व्या मार्गिकेचे काम पूर्ण ; लोकल प्रवास होणार वेगवान

 

लोकलच्या तब्बल 80 नव्या फेऱ्या वाढणार – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

कल्याण-डोंबिवली दि.8 फेब्रुवारी :
मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या ठाणे पलिकडील लाखो प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ठाणे दिवा रेल्वे स्टेशन दरम्यानच्या 5 व्या आणि 6 व्या मार्गिकेचे काम अखेर पूर्ण झाले आहे. परिणामी अप आणि डाऊन मार्गावर लोकलच्या तब्बल 80 फेऱ्या वाढण्याचा मार्गही मोकळा झाल्याची माहिती हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. (5th-6th line between Thane Diva completed; Local travel will be faster)

ठाणे-दिवा स्थानकादरम्यान गेल्या शुक्रवारी मध्यरात्रीपासून सोमवारी रात्री 12 वाजेपर्यंत 72 तासांचा तर 23 जानेवारीला 14 तासांचा मेगाब्लॉक घेत मध्य रेल्वेने या दोन्ही मार्गिकांचे काम पूर्ण केले. काम पूर्ण झालेले हा 5 वा आणि 6 वा रेल्वेमार्ग मेल, एक्स्प्रेस गाडय़ांसाठी वापरण्यात येणार आहे. सध्या ठाणे ते कुर्ला आणि दिवा ते कल्याणपर्यंत पाचवी- सहावी स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध आहेत. तर ठाणे – दिवा दरम्यान उपलब्ध असलेल्या फास्ट ट्रॅकवरूनच लोकल आणि मेल-एक्स्प्रेस धावत होत्या. यामुळे अनेकदा मेल-एक्स्प्रेसमूळे फास्ट लोकलचा खोळंबा होत होता. मात्र आता मेल-एक्स्प्रेस आणि लोकलसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध असून प्रवाशांचा वेळ वाचण्यासह लोकलच्या फेऱ्या वाढवणेही आता रेल्वे प्रशासनाला शक्य असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले.

2007 -08 मध्ये प्रकल्प मंजूर मात्र खरी गती 2015 नंतरच…

2007 – 2008 या वर्षात या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असली तरी 2015 नंतरच या कामाला गती मिळाली. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे गेल्या 7 वर्षांपासून या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आग्रही होते. त्यांनी प्रत्येक टप्प्यावर कामाची पाहणी आणि पाठपुरावा केला होता. मध्य रेल्वे, एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका,पाहणी दौरे करत हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तब्बल 625 कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आज पूर्ण होतो आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे पल्याडच्या रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार असून प्रवाशांना अधिकच्या लोकल मिळणार आहेत, असे डॉ. शिंदे यावेळी म्हणाले. ‘यापूर्वी मार्गिका कमी असल्याने लोकल आणि एक्सप्रेस एकच मार्गिकेवर येत होत्या. परिणामी उशीर होणे, गाड्यांचा खोळंबा होणे असे प्रकार होत होते.

कुर्ला ते कल्याणपर्यंत एक्सप्रेस गाड्यांचा प्रवास होणार विनाथांबा…

आता लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला ते कल्याणपर्यंत एक्सप्रेस गाड्यांचा प्रवास विनाथांबा होणार आहे. स्वतंत्र सहा मार्ग उपलब्ध झाल्याने लोकल, एक्सप्रेस आणि मालगाड्या स्वतंत्र मार्गिकांवर धावतील. या कामामुळे अप आणि डाऊन मार्गांवर सुमारे 80 लोकल सुरू होऊ शकणार आहेत, अशी माहितीही डॉ. शिंदे यांनी दिली. दिवा स्थानकात सुविधा देण्याबाबत बोलताना, ‘रेल्वे वरील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे लवकरच येथील फाटक बंद होईल. तर कोकण रेल्वेकडे जाणाऱ्या स्थानकांच्या कनेक्टिव्हिटीसाठी प्रयत्न सुरू असून दिवा स्थानकात अतिरिक्त सुविधा देण्याबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसोबत बैठक होणार असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान कल्याण ते ठाणे रेल्वे प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाकांक्षी असा प्रकल्प तब्बल 15 वर्षांच्या रखडपट्टीनंतर पूर्णत्वास गेला आहे. याचे सकारात्मक परिणाम लवकरच पाहायला मिळतील अशी अपेक्षा रेल्वे प्रवासी व्यक्त करत आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा