कल्याण दि.17 डिसेंबर :
अवघ्या काही वर्षांतच देशभरातील धावपटूंमध्ये आपला नवलौकिक मिळविलेल्या कल्याणच्या आयमेथॉन 4 मध्ये यंदा रेकॉर्डब्रेक 5 हजार धावपटू सहभागी झाले होते. ज्यामध्ये कल्याण डोंबिवली, ठाणे मुंबई आणि देशाच्या विविध राज्यांतील धावपटूंसह विदेशातील धावपटूंचाही समावेश होता. या स्पर्धेतून मिळालेले सर्व उत्पन्न समाजातील वंचित मुलांसाठी काम करणाऱ्या सजग चॅरिटेबल ट्रस्टला देण्यात आले. (5 thousand runners ran in Imathon in Kalyan; The activity was implemented to help the social organization)
कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर, डीसीपी सचिन गुंजाळ, केडीएमसीचे उपायुक्त अतुल पाटील, माहिती जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव, आयएमए अध्यक्ष डॉ. ईशा पानसरे, माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सजग संस्थेच्या सजिता लिमये यांनी ही आर्थिक मदत स्विकारली.
दुर्गाडी चौकाजवळ असलेल्या रिंगरोड परिसरातून मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत देशातील दर्जेदार अर्धमॅरेथॉन स्पर्धा असा नावलौकिक प्राप्त केलेल्या कल्याणच्या आयमेथॉनमध्ये 5 हजार धावपटूंनी सहभाग घेतला होता. आयुष हॉस्पिटलच्या मुख्य प्रयोजकत्वातून 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर अशा चार गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. अश्विन कक्कर यांनी विशेष मेहनत घेतली. ज्याला आयएमए कल्याणच्या उपाध्यक्ष डॉ.सुरेखा ईटकर, सचिव डॉ. विकास सूरंजे, वरिष्ठ सदस्य डॉ. अश्विन कक्कर, डॉ. राजेश राघव राजू, डॉ.अमित बोटकुंडले यांच्यासह कल्याण रनर्स ग्रुपचे समीर पाटील, सचिन सालीयन यांच्यासह सर्व टीमची मोलाची साथ लाभली.
या स्पर्धेसाठी कल्याण, डोंबिवली, ठाणे , मुंबई परिसरासह दिल्ली, आसाम, हरियाणा, पंजाब, केरळसह केनियातील काही आंतरराष्ट्रीय धावपटू सहभागी झाले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तर सहभागी स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी अनेक सामाजिक संस्था आणि कल्याणकर नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
दरम्यान यावेळी केडीएमसी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी आपल्या टीमसह ऊर्जा संवर्धनाबाबत जनजागृतीपर कार्यक्रम सादर केला. ज्याला उपस्थितांनी मोठी दाद दिली.