906 जणांवर महावितरणने केले गुन्हे दाखल
कल्याण/भांडुप दि.21 जानेवारी :
महावितरणच्या कल्याण आणि भांडुप परिमंडलाने वीजचोरी विरोधात धडक कारवाई केली आहे. गेल्या ९ महिन्यांत ९ हजार २५७ जणांविरुद्ध कारवाई करत महावितरणने ४६ कोटी ७८ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. वीजचोरीची देयके न भरणाऱ्या ९०६ ग्राहकांवर महावितरणतर्फे थेट पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर दोन्ही परिमंडलात ८८० जणांविरुद कारवाई करून ५ कोटी ७ लाख रुपयांचा अनधिकृत वीजवापर उघडकीस आणण्यात आला आहे.(46 crore 78 lakh electricity theft; Action taken against 9 thousand 257 electricity thieves by Mahavitran
कल्याण परिमंडलात नऊ महिन्यांच्या कालावधीत…
कल्याण परिमंडलात १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२४ या नऊ महिन्यांच्या कालावधीत आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या २ हजार ६२५ जणांवर कारवाई करून ४ कोटी ६६ लाख रुपयांची वीजचोरी पकडण्यात आली. तर मीटरमध्ये फेरफार अथवा टॅपिंग करून विजेचा चोरटा वापर करणाऱ्या ३ हजार ९४२ जणांकडे २२ कोटी ४० लाख रुपयांची वीजचोरी आढळून आली. याशिवाय ४०३ जणांविरुद्ध कारवाई करून २ कोटी २३ लाख रुपयांचा विजेचा चोरटा वापर उघडकीस आणण्यात महावितरणच्या पथकांना यश आले. चोरीच्या विजेचे देयक व दंडाचा भरणा टाळणाऱ्या ८१८ जणांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भांडुप परिमंडलात नऊ महिन्यांच्या कालावधीत…
भांडुप परिमंडलात नऊ महिन्यांच्या कालावधीत आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या ४१७ जणांवर कारवाई करून १ कोटी ९९ लाख रुपयांची वीजचोरी पकडण्यात आली. तर मीटरमध्ये फेरफार अथवा टॅपिंग करून विजेचा चोरटा वापर करणाऱ्या २ हजार २७३ जणांकडे १७ कोटी ७३ लाख रुपयांची वीजचोरी आढळून आली. याशिवाय ४७७ जणांविरुद्ध कारवाई करून २ कोटी ८४ लाख रुपयांचा विजेचा चोरटा वापर उघडकीस आणण्यात महावितरणच्या पथकांना यश आले. चोरीच्या विजेचे देयक आणि दंड भरणे टाळणाऱ्या ८८ जणांविरुद्ध वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वीज चोरांविरोधात ३ वर्षे कारावास किंवा आर्थिक दंडाची तरतूद…
वीजचोरी हा सामाजिक आणि जबर शिक्षा आणि दंडाची तरतूद असलेला गंभीर फौजदारी गुन्हा आहे. या गुन्ह्यात ३ वर्षे कारावास किंवा दंड अथवा या दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. ही बाब लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारे विजेचा चोरटा किंवा अनधिकृत वापर कटाक्षाने टाळावा. अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे आहे.