Home ठळक बातम्या दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये झळकले कल्याण रनर्सचे ३ स्पर्धक

दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये झळकले कल्याण रनर्सचे ३ स्पर्धक

तब्बल ९० किलोमीटरची मॅरेथॉन केली यशस्वीपणे पूर्ण 

कल्याण दि. ३० ऑगस्ट :
जगातील सर्वात कठीण आणि जुनी मॅरेथॉन अशी ओळख असणारी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन कल्याणातील तिघा स्पर्धकांनी यशस्वीपणे पूर्ण करत नवा अध्याय रचला आहे. डॉ. मिलिंद ढाले, दिलीप घाडगे आणि बिंदेश सिंग अशी या तिघा स्पर्धकांची नावे आहेत.

 

90 किलोमीटरची कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीपणे केली पूर्ण…

दक्षिण आफ्रिकेतील डर्बन ते जोहान्सबर्ग या दोन शहरांदरम्यान गेल्या रविवारी 28 ऑगस्ट 2022 रोजी ही कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. ज्यामध्ये कल्याण रनर्स ग्रुपच्या माध्यामतून हे तिघेही स्पर्धक सहभागी झाले होते. डॉ. मिलिंद ढाले, दिलीप घाडगे आणि बिंदेश सिंग यांनी ही तब्बल 90 किलोमीटरची कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण करून कल्याण रनर्स आणि कल्याण डोंबिवलीचे नाव जगाच्या पाठीवर झळकावले आहे. कल्याण रनर्सचे मुख्य प्रशिक्षक समीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली.

 

जगभरातील तब्बल 15 हजार स्पर्धकांचा सहभाग…

दक्षिण आफ्रिका येथे पार पडलेली ही कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठेची गणली जाते. या स्पर्धेला नुकतेच 100 वर्षे पूर्ण झाली असून यावर्षी त्यात जगातील 15 हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. दक्षिण आफ्रिकेतील या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन ती पूर्ण करणे हे जगातील सर्व मॅरेथॉन रनर्सचे एक स्वप्न असते. मात्र त्यातील विविध आव्हाने म्हणजे स्पर्धकांच्या संयम, क्षमता सहनशिलता आदी कौशल्याची परीक्षा घेणारी असतात.

अत्यंत आव्हानात्मक आणि शरीराचा लागतो कस…

एखादी ४२ किलोमीटर अंतराची पूर्ण मॅरेथॉन चार तास आणि पन्नास मिनिटांच्या आतमध्ये पूर्ण केली असेल तरच दक्षिण आफ्रिकेतील या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये प्रवेश दिला जातो. तसेच या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतल्यानंतर 90 किलोमीटरचे हे अंतर 12 तासांच्या आत न थांबता पूर्ण केल्यासच स्पर्धकांना गौरवले जात असल्याची माहिती मुख्य प्रशिक्षक समीर पाटील यांनी दिली. त्याशिवाय ९० किलोमीटरपैकी 21 किलोमीटर, 42 किलोमीटर आणि 65 किलोमीटरचे अंतर हे ठराविक वेळेतच पूर्ण करावे लागते. अशा सर्व कठीण आव्हानांवर कल्याण रनर्स ग्रुपच्या डॉ. मिलिंद ढाले, दिलीप घाडगे आणि बिंदेश सिंग या स्पर्धकांनी मात करत ही 90 किलोमीटर कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केल्याचेही समीर पाटील यांनी सांगितले.

दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान असणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये कल्याण रनर्स ग्रुपच्या स्पर्धकांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा