Home क्राइम वॉच बनावट बांधकाम परवानगीप्रकरणी केडीएमसीकडून तब्बल 27 विकासकांवर गुन्हे दाखल

बनावट बांधकाम परवानगीप्रकरणी केडीएमसीकडून तब्बल 27 विकासकांवर गुन्हे दाखल

 

कल्याण डोंबिवली दि. 28 सप्टेंबर :

बनावट बांधकाम परवानगी आदेश बनवून फसवणूक केल्याप्रकरणी केडीएमसीकडून मानपाडा पोलीस ठाण्यात एकाच वेळी 27 विकासकांकांवर गुन्हे दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL ) दाखल असून केडीएमसी आयुक्तांकडेही तक्रार अर्जही सादर करण्यात आला होता. त्यानंतर केडीएमसीकडून झालेल्या पडताळणीमध्ये बांधकाम परवानग्या बनावट असल्याचे आढळून आल्याची माहिती आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील सत्तावीस गावांमधील 27 बांधकाम आणि डोंबिवली विभागातील 39 बांधकाम परवानग्या असे मिळून एकूण 67 बांधकाम परवानगी आदेश बनावटरित्या तयार करण्यात आले असून त्यावर कारवाई करण्याचे आर्किटेक्ट संदीप पाटील यांनी जनहित याचिकेमध्ये नमूद केले आहे. तसेच या बांधकाम परवानग्यासंदर्भात पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांकडेही लेखी तक्रार केली आहे. त्यावरून केडीएमसीच्या नगर रचना (टाऊन प्लॅनिंग) विभागातील सहाय्यक संचालकांनी या बांधकाम परवानग्या तपासल्या असता त्या बनावट असल्याचे आढळून आल्याचेही मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यासंदर्भात केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितले की अशा प्रकारे एकूण 67 परवानग्या बनावट कागदपत्रे तयार करून दिल्या गेल्याचे संबंधित विकासकांनी भासवले आहे. तसेच या परवानग्या च्या आधारावर त्यांनी रेराकडेही रजिस्ट्रेशन केल्याची माहिती आयुक्त डॉ. दांगडे यांनी दिली. तसेच या विकासकांवर गुन्हे दखल करण्यात आल्या असून रेरा संस्थेशीही यासंदर्भात संपर्क साधण्यात येत आहे. केडीएमसीकडून विकासकांना देण्यात आलेल्या बांधकाम परवानग्या केडीएमसीच्या वेबसाईटवरही टाकल्या जात असून रेरा आणि आपली वेबसाईट जोडण्यात येणार आहे. जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडणार नसल्याचेही आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा