कल्याण ग्रामीण दि.18 नोव्हेंबर:
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत अखेरचा रविवार सार्थकी लावताना कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारानिमित्त डोंबिवली शहरातील परिसरातून प्रचार रॅली काढण्यात आली. हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत डोंबिवलीतील स्वामी विवेकानंद दत्तनगर शाळेपासून काढण्यात आलेल्या या रॅलीत ढोल ताशांचा गजर, घोषणांची गर्जना आणि महायुतीचे फडकत असलेले झेंडे यामुळे शहरात निवडणुकीचा माहोल रंगल्याचे दिसून आले.
( Spontaneous response to Mahayuti candidate Rajesh More’s campaign rally; The city of Dombivli resounded with the sound of drums and slogans)
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मागील १२ दिवसांपासून सुरू असलेला प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज प्रचाराचा शेवटचा रविवार असल्याने सकाळपासूनच उमेदवार राजेश मोरे यांच्या समवेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत विविध सामाजिक संघटना सोसायट्यांचे पदाधिकारी,पक्षाचे महत्त्वाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या बैठका घेत त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. तर संध्याकाळी ६ वाजता डोंबिवली पूर्वेकडील स्वामी विवेकानंद शाळा दत्तनगर इथून राजेश मोरे यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली. ढोल ताशांचा गजर, गुलाल फुलांची उधळण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा विजय असो, शिवसेना पक्षाचा विजय असो यासारख्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
कार्यकर्त्यांच्या गळ्यातील स्कार्फ, टोप्या आणि महायुतीतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या हातात असलेले झेंडे यामुळे संपूर्ण शहरच जणू भगवामय झाल्याचे दिसून आले. डोंबिवली दत्तनगर आयरे रोड आयकॉन हॉस्पिटल उद्योग नगरी, डोंबिवली एमआयडीसी परिसरातून निघालेली ही रॅली डोंबिवली निवासी भागातील शिवसेना शाखा कार्यालयासमोर समाप्त करण्यात आली
या रॅलीत शिवसेना पदाधिकारी राजेश कदम, गजानन व्यापारी, माजी नगरसेवक रणजीत जोशी, संजय पावशे, सुरेश जोशी यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी या रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित होते