कल्याण/वसई/पालघर दि. १५ मार्च :
कल्याण परिमंडलातील ३ लाख २० हजार ३०१ ग्राहकांकडे १९१ कोटी ११ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. त्यामूळे थकीत वीजबिलांचा भरणा टाळणाऱ्या थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने तीव्र केली असून १३ मार्चपर्यंत कल्याण परिमंडलात तब्बल ९ हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. (200 crores in outstandings; Electricity supply to around 9 thousand customers in Kalyan Parimandal has been cut off
कल्याण परिमंडलातील ३ लाख २० हजार ३०१ ग्राहकांकडे १९१ कोटी ११ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. कल्याण पूर्व आणि पाश्चिम आणि डोंबिवली विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत ५० हजार ५१४ ग्राहकांकडे २८ कोटी ३ लाख रुपयांची थकबाकी असून १ हजार १९१ थकबाकीदांराचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
उल्हासनगर एक आणि दोन व कल्याण ग्रामीण विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल दोन अंतर्गत ९६ हजार ९४८ ग्राहकांकडे ६८ कोटी ६१ लाख रुपयांचे वीजबिल थकित असून ३ हजार ६३३ जणांची वीज खंडित केली आहे.
तर वसई आणि विरार विभागाचा समावेश असलेल्या वसई मंडलातील १ लाख १० हजार २३९ ग्राहकांकडे ५० कोटी ५३ लाख रुपयांची थकबाकी असून ३ हजार ३९७ जणांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. तर पालघर मंडलातील ६२ हजार ६०० ग्राहकांकडे ४४ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे आणि ५७४ जणांची वीज खंडित करण्यात आली आहे.
थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकी आणि नियमानुसार जीएसटीसह पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत होणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर चालू बिलासह थकबाकीचा भरणा करून संभाव्य गैरसोय टाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
वीजबिल भरणा सोयीचा व्हावा, यासाठी रविवार आणि इतर सुट्टींच्या दिवशीही भरणा केंद्र सुरु ठेवण्यात आली आहेत. याशिवाय महावितरणचे संकेतस्थळ, ग्राहकांसाठीचे मोबाईल ॲप, विविध पेमेंट वॅलेट आदींच्या माध्यमातून डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग मार्फत वीजबिल ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधांचा उपयोग करून संबंधित ग्राहकांनी थकबाकी व इतर ग्राहकांनी चालू वीजबिलाचा विहित मुदतीत भरणा करण्याचे आवाहन महावितरकडून करण्यात आले आहे.