या घटनेत दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करणार – डीसीपी अतुल झेंडे
कल्याण दि. 20 डिसेंबर :
कल्याणच्या योगीधाममधील मराठी कुटुंबाच्या मारहाणीचे प्रकरणाचे पडसाद विधानसभेच्या अधिवेशनात उमटल्यानंतर पोलीस प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर संबंधित कुटुंब आणि नागरिकांच्या शिष्टमंडळाने गंभीर आरोप केल्यानंतर यासाठी कल्याणच्या एसीपींकडून स्वतंत्रपणे चौकशी केली जाणार आहे. तसेच या चौकशीत जे कोणी अधिकारी – कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती डीसीपी अतुल झेंडे यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली आहे. (2 persons detained in case of Marathi family beating in Kalyan; concerned police officers will be interrogated through ACP)
कल्याणच्या योगीधाम परिसरातील या घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिक रहिवासी आणि राजकीय संघटनांच्या शिष्टमंडळाने आज डीसीपी अतुल झेंडे यांची भेट घेतली. खडकपाडा पोलिसांनी या अखिलेश शुक्लाला पाठीशी घालण्यासह या मारहाणीत गंभीर जखमी कुटुंबाला मात्र अन्याय वागणूक दिल्याचे गंभीर आरोप या शिष्टमंडळाने केले. तसेच या प्रकरणी आरोपीला वाचवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी वेगळेच कलमे दाखल केली तसेच शुक्ला पोलीस ठाण्यात येऊनही त्याला ताब्यात न घेता पळून जाण्यासाठी मदत केल्याचा गंभीर आरोपही यावेळी बैठकीत करण्यात आला आहे.
तर या संपूर्ण प्रकरणाची आम्ही गंभीर दखल घेतली असून यातील दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती डीसीपी अतुल झेंडे यांनी यावेळी दिली. तसेच मुख्य आरोपीच्या शोधासाठी आम्ही चार पथकं रवाना केली आहेत. तसेच या घटनेत मारहाण झालेल्या देशमुख कुटुंबीयांचा पुन्हा एकदा जबाब घेतला जाणार असल्याचेही डी सी पी झेंडे यांनी यावेळी सांगितले.
कल्याण एसीपीकडून केली जाणार अधिकाऱ्यांची चौकशी होणार…
तर याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या मराठी कुटुंबाला खडकपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांकडून अन्याय वागणूक देण्यात आल्याचा आरोप नागरिकांच्या शिष्टमंडळाने केला आहे. त्याची दखल घेत कल्याणचे ए सी पी कल्याणजी घेटे यांच्या माध्यमातून त्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याची माहितीही यावेळी डीसीपी अतुल झेंडे यांनी यावेळी दिली. तसेच या चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही झेंडे यांनी दिला आहे.
या बैठकीला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे पदाधिकारी, माय मराठी प्रतिष्ठानचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह योगीधाम येथील स्थानिक नागरिकही उपस्थित होते.