
कल्याण – डोंबिवली दि.21 जुलै :
मुंबई महापालिकेनंतर आता कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलातही पहिल्यांदाच 15 महिला अग्निशामक कर्मचारी दाखल झाल्या आहेत. बाह्य यंत्रणेद्वारे त्यांचा केडीएमसी अग्निशमन दलात समावेश करण्यात आला असून या 15 अग्निशामक महिला कर्मचारीही आता आपत्ती काळात इतर अग्निशमन अधिकारी – कर्मचाऱ्यांसोबत कर्तव्य बजावताना दिसणार आहेत.
सध्याच्या घडीला या अग्निशामक महिला कर्मचारी टिटवाळा, आधारवाडी, कल्याण(प), डोंबिवली (प) येथील अग्निशमन केंद्रात कार्यरत राहणार आहेत. विविध आपत्तीचे प्रसंगी नागरिकांना प्राधान्याने मदत करण्यात महापालिकेचे अग्निशमन पथक नेहमीच अग्रेसर असते. यामध्ये आता महिलांना देखील अग्निशामक या पदावर कार्यरत ठेऊन महापालिकेने महिलांप्रती प्रगतीचे नवे दालन खुले केले आहे.
दरम्यान महापालिकेची आधारवाडी कल्याण पश्चिम, टिटवाळा पूर्व, कल्याण पूर्व, एमआयडीसी, डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम या पाच ठिकाणी अग्निशमन केंद्र कार्यरत असून आता डोंबिवलीतील पलावा परिसरातही अग्निशमन केंद्र अग्निशमन विभागाचे उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा सुरू करण्यात आलेले आहे. या अग्निशमन केंद्राचा फायदा आपत्तीचे वेळी नजीकचा ग्रामीण परिसर, 27 गावे यांना होईल अशी माहिती महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली आहे.