डोंबिवली दि.17 मार्च :
बँकींग क्षेत्रातील अग्रेसर बँक असणाऱ्या डोंबिवली नागरी सहकारी बँकेवर सायबर हल्ला करत दिड कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीनी या बँकेचा सर्व्हर हॅक करून मोठा आर्थिक अपहार करण्याचा प्रयत्न केला. मात्र बँकेच्या आयटी विभागाने सतर्कता दाखवत केलेल्या उपाय योजनांमुळे तो निष्फळ ठरला. (1.5 crore fraud by hacking Dombivli Bank server; The bank’s vigilance averted a major fraud)
डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या सर्व्हरवर काल अज्ञात हॅकरने हल्ला केला. या हॅकरने बॅंकेचा सर्व्हर हॅक करत 1 कोटी 51 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बँकेचे निरंजन मधुसूदन राईलकर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात नोंदवली. नवी मुंबईच्या महापे येथे असणाऱ्या बँकेच्या सर्व्हरमध्ये अज्ञात इसमाने बेकायदेशीररित्या प्रवेश करत बँकेच्या डेटामध्ये अफरातफर करत ही आर्थिक फसवणूक केल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. तर मानपाडा पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 65 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली नागरी सहकारी बँकेवर सायबर हल्ला, मात्र सर्व ठेवी सुरक्षित आणि बँकेची आर्थिक स्थितीही भक्कम – अध्यक्ष अॅड. गणेश धारगळकर
डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याने अज्ञात इसमांनी सुमारे् ₹ १.५० कोटींची फसवणूक केली आहे. सायबर हल्लेखोराचा ₹ १० कोटींहून अधिक रक्कमेचा अपहार करण्याचा प्रयत्न होता. परंतू आय्.टी. विभागातील अधिकारी – कर्मचा-यांनी सतर्कतेने सर्व्हर बंद केल्याने अधिक फसवणूक टाळता आल्याची प्रतिक्रिया डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष अॅड. गणेश धारगळकर यांनी दिली आहे. तसेच याबाबत पोलिसांत गुन्हा नोंदवला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. या प्रकारामुळे ग्राहकांच्या आणि अन्य सर्व ठेवी सुरक्षित असून बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचेही अध्यक्ष अॅड. धारगळकर यांनी स्पष्ट केले आहे.
तर ज्या बँक खात्यात ही रक्कम वळवण्यात आली आहे. त्या सर्व बँकांना याबाबत माहिती देण्यात आली असून त्या बँकांकडून पैसे परत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी त्या बँकांकडूनही सहकार्य मिळत असल्याचे अध्यक्ष अॅड. गणेश धारगळकर यांनी सांगितले.त्याशिवाय डोंबिवली बँकेच्या आयटी विभागाने अश्या प्रकारचे सायबर हल्ले लगेच ओळखता यावे यासाठी पुरेशी उपाययोजना खूप आधीच केली आहे. या सर्व उपाययोजना आणि सतर्कतेमुळेच वेळीच हा हल्ला लक्षात आला आणि त्यावर त्वरीत कार्यवाही करण्यात आल्याचेही अॅड. गणेश धारगळकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.