Home ठळक बातम्या येत्या आठवड्याभरात भरणार कल्याण डोंबिवलीतील खड्डे – केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे

येत्या आठवड्याभरात भरणार कल्याण डोंबिवलीतील खड्डे – केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे

कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईचा इशारा

कल्याण-डोंबिवली दि.6 ऑगस्ट :
मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली असून येत्या आठवड्याभरात हे खड्डे भरण्याचे काम केले जाईल अशी माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली. आज सकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने कल्याण डोंबिवलीत सुरू असणाऱ्या खड्डे भरण्याच्या कामाचा केडीएमसी आयुक्तांनी अधिकाऱ्यांसह आढावा घेतला.

गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या दोन्ही शहरांतील प्रमूख असो की अंतर्गत रस्ते या दोन्ही ठिकाणी खड्ड्यांचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरले आहे. ज्याचा त्रास वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांना होत असून केडीएमसी प्रशासनावर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी आज कल्याण डोंबिवलीतील प्रमूख रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या कामाची पाहणी केली.

पावसाने उघडीप दिली असून येत्या आठवड्याभरात डांबर, कोल्डमिक्स, आरएमसी आणि पेव्हर ब्लॉक आदी माध्यमातून रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम केले जाईल. तसेच गेल्या आठवड्यात एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या ताब्यातील रस्ते सुस्थितीत ठेवण्याचे निर्देश दिल्याचेही आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले. तर या खड्डे भरण्याच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईचा इशाराही आयुक्तांनी यावेळी दिला.

म्हणून कंत्राटदाराला ठोठावला 50 हजार रुपये दंड…
कल्याण डोंबिवलीत खड्डे भरण्याच्या कामावेळी केडीएमसीचा लोगो आणि नाव नसणारे जॅकेट घातल्याबद्दल संबंधित कंत्राटदाराला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचे निर्देश त्यांनी यावेळी शहर अभियंता अर्जुन अहिरे यांना दिले.

यावेळी त्यांनी कल्याण मधील दुर्गाडी परिसर, डोंबिवली पूर्वेतील घारडा सर्कल रोड, राजेंद्र प्रसाद रोड, डोंबिवली पश्चिम येथील देवीचा पाडा,शास्त्रीनगर रुग्णालय रोड तसेच पंचायत बावडी रोड द्वारली इ. परिसराची पाहणी केली.

या पाहणी दौऱ्यावेळी शहर अभियंता अर्जुन अहिरे यांच्यासह कल्याण डोंबिवलीतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जनसंपर्क विभागाचे प्रमुख संजय जाधव उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा