home Featured, Politics समृद्धी महामार्गाबाबत आपण शेतकऱ्यांच्या पाठिशी- खासदार कपिल पाटील

समृद्धी महामार्गाबाबत आपण शेतकऱ्यांच्या पाठिशी- खासदार कपिल पाटील

कल्याण, दि. 14 जुलै :
समृद्धी महामार्गाच्या विरोधात आपण नाही. मात्र, महामार्गासाठी भूसंपादनाच्या प्रश्नात आपण शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकतीच बैठक घेण्यात आल्याची माहिती खासदार कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. खासदारपदाच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी कल्याणमध्ये खासदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

 
समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनामध्ये आपण शेतकऱ्यांच्या पाठिशी आहोत. राज्यात भाजपचे सरकार सत्तेत असले, तरी शेतकऱ्यांचा प्रश्न महत्वाचा आहे. समृद्धी महामार्गाला आमचा विरोध नाही. या महामार्गासाठी भूसंपादनावरुन शेतकऱ्यांचे समाधान करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकतीच बैठक घेण्यात आली होती, असे खासदार पाटील यांनी सांगितले. भिवंडी रोड-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान अतिरिक्त लाईन टाकली आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे रेल्वेसेवा सुरू करता येत नाही. टिटवाळा ते मुरबाड रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाले असून, या मार्गाला मंजुरी मिळविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले.

 
तर ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेसेवा मंजूर झाली असून, ती लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. भिवंडी व डोंबिवलीला जोडणाऱ्या माणकोली मोठा गाव-ठाकूर्ली पूलाचे काम भूसंपादनाअभावी रखडले आहे. तेथील शेतकऱ्यांचे समाधान करून भूसंपादन केले जाईल. त्यानंतर या कामाला सुरुवात होईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

 

या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, माजी स्थायी समिती सभापती आणि नगरसेवक संदीप गायकर, गटनेते वरूण पाटील यांच्यासह अनेक नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *