Home News तुकाराम मुंढेंना इकडे आयुक्त म्हणून आणण्यासाठी प्रयत्नशील – गणपत गायकवाड

तुकाराम मुंढेंना इकडे आयुक्त म्हणून आणण्यासाठी प्रयत्नशील – गणपत गायकवाड

1
SHARE

कल्याण दि.10 जुलै :

कल्याण-डोंबिवली महापालिकेत यापूर्वी यु. पी.एस. मदान, टी. चंद्रशेखर, श्रीकांत सिंह यांच्यासारखे चांगले आयुक्त लाभले होते. मात्र आता तसे आयुक्त येत नसल्याने आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तुकाराम मुंढे यांना आयुक्त म्हणून द्या, अशी मागणी केल्याची माहिती आमदार गणपत गायकवाड यांनी दिली आहे. कल्याण डोंबिवली पत्रकार संघातर्फे आयोजित ‘दिलखुलास संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना गायकवाड यांनी कल्याण पूर्वेचा विकास, सद्यस्थिती, स्मार्ट सिटी योजनेत झालेले दुर्लक्ष, नेवाळी आंदोलन, आतापर्यंतचा राजकीय प्रवास आणि भविष्यातील निर्णय यांसारख्या अनेक महत्वाच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.

कल्याण डोंबिवली महापालिकेचा सध्याचा कारभार पाहता शहराच्या विकासासाठी कठोर निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज आहे. त्यासाठीच तुकाराम मुंढे यांच्यासारखी व्यक्ती इकडे आयुक्त म्हणून असावी यासाठी आपण प्रयत्नशील असून मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणीही केली आहे. महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांमूळे कल्याण पूर्वेत समस्यांचा डोंगर उभा राहिल्याची तोफ त्यांनी डागली.

 

तर शेतकऱ्यांच्या आडून आपले गोरख धंदे लपविणाऱ्या वाचवू पाहणाऱ्या भूमाफिया आणि बेकायदा बांधकामे करणाऱ्या बिल्डर्समुळे नेवाळीतील आंदोलन हिंसक झाले. या आंदोलनात माझ्या गाडीवर देखील दगडफेक करण्यात आली. तरीही मनात कटुता न ठेवता जखमी झालेल्या आंदोलकांवरील उपचाराचा संपूर्ण खर्च आपण स्वतः केल्याचे आमदार गायकवाड यांनी सांगितले.

 

तसेच कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आपण अपघाताने राजकारणात आलो. अनेक जण पैसा कमाविणे हा उद्देश ठेवून राजकारणात येतात. मात्र मी गरिबी जवळून अनुभवली आहे. चांगल्या मार्गाने पैसा आधी कमविला नंतर राजकारणात प्रवेश केला. मात्र आजही आपली नाळ सर्वसामान्य जनतेशी जोडलेली असल्याने सलग दोन वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो. येथील जनतेचे आपल्यावर उपकार असून त्यांचे जीवन सुलभ आणि सुखी करण्यासाठी आपण  प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचेही आमदार गायकवाड यांनी स्पष्ट केले.

 
दरम्यान या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी आमदार गायकवाड यांना आपले प्रश्न विचारले. ज्यांची त्यांनी अतिशय मनमोकळ्या पद्धतीने आणि समाधानकारक उत्तरं दिल्याचे दिसून आले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*