home Crime Watch, Featured उल्हासनगरमध्ये माणुसकीला काळीमा: चकली खाल्ली म्हणून चिमुरड्यांची अर्धनग्न धिंड

उल्हासनगरमध्ये माणुसकीला काळीमा: चकली खाल्ली म्हणून चिमुरड्यांची अर्धनग्न धिंड

उल्हासनगर दि.22 मे : उल्हासनगरात माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून दुकानातील चकली खाल्ल्याच्या रागातून दुकानदाराने दोघा चिमुरड्या भावंडांची नग्न धिंड काढून त्यांचे मुंडन करत त्याबाबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकरणी हिललाइन पोलिसांनी आरोपी पितापुत्रांना अटक केली आहे. किरकोळ कारणावरून लहानग्यांची धिंड काढण्याच्या या धक्कादायक प्रकारामुळे उल्हासनगर शहरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
उल्हासनगर – ५ येथील हिललाइन पोलिस ठाण्याजवळ असलेल्या परिसरात शनिवारी हा प्रकार घडला. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही ८ व ९ वर्षांची भावंडे आपल्या घराजवळ खेळत होती. खेळत असताना या मुलांनी आपल्या परिचयातील एका दुकानातील बरणीतील चकली सहज खाल्ली. मात्र दुकानदार मेहमूद जुबेला पठाण (६९) याला या गोष्टीचा राग आल्याने त्याने दोघाना बेदम मारहाण केली. मेहमूद याची दोन मुले इरफान मेहमूद पठाण (२६) व तौकल उर्फ सलीम मेहमूद पठाण (२२) या दोन नराधमांनी तर दोन्ही भावांना अर्धनग्न करून मारहाण केली, त्यांचे अर्धे केस कापले व त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घालून तब्बल दीड तास त्यांची धिंड काढली.
अखेर एका महिलेने हा प्रकार थांबविला व मुलांना आपल्या ताब्यात घेतले. या दोन लहान मुलांची आई कामावरून परतल्यानंतर तिने हिललाइन पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी मेहमूद व त्याच्या दोन मुलांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या सर्व प्रकाराबाबत परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *